₹856.50 चा सिलेंडर 950 रुपयांना!
चाळीसगाव प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरचा दर ₹856.50 निश्चित असताना चाळीसगाव शहरात मात्र ग्राहकांकडून ₹950 इतकी रक्कम वसूल केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरातील गॅस ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असून, हा प्रकार एजन्सीचा अधिकृत दर आहे की काही कर्मचारी मनमानी वसुली करत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एका जागृत ग्राहकांने सांगितले की, गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडर वितरक दरापेक्षा तब्बल ₹40 ते 100 रुपये अधिक घेत आहेत. यामध्ये कोणतीही पावती न देता रक्कम घेतली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामुळे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचे आर्थिक शोषण होत असून, त्यांना नाईलाजाने जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
“सरकारी दर वेगळा आणि आम्हाला आकारला जाणारा दर वेगळा — हा कोणता न्याय?” असा संतप्त सवाल अनेक नागरिक करत आहेत. काही ग्राहकांनी सिलेंडर पोहोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, “डिलिव्हरी चार्ज”, “वाहतूक खर्च” अशी कारणे पुढे करण्यात येत असल्याचा आरोप आहे. मात्र, असा अतिरिक्त शुल्क आकारण्याचा अधिकृत आदेश आहे का? याचे कोणतेही ठोस उत्तर ग्राहकांना मिळालेले नाही.
दरम्यान, शहरातील गॅस वितरकांनी या प्रकरणावर खुलासा करावा आणि पुरवठा अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. तसेच, ग्राहकांना अधिक रक्कम आकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.