चाळीसगाव-इराण इस्त्राईल संघर्षामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा संपूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. याचा फटका चाळीसगावातील ५० वर्ष जुनी शाकाहारी खानावळला बसला आहे. गॅस अभावी खानावळ गेल्या चार दिवसापासून बंद आहे यामुळे खानावळीवर अवलंबून असलेले विद्यार्थी, नागरिक, नोकरदार वर्गाला जेवणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मशहूर असलेली महाशब्दे खानावळ गेल्या ५० वर्षापासून महाशब्दे कुटुंबीय सातत्याने चालवीत आहे. अगदी कोरोना काळात देखील ही खानावळ नित्य नियमाने सुरू होती. या ठिकाणी विद्यार्थी, नागरिक व नोकरदार वर्गातील अनेक कर्मचारी जेवणासाठी येत असतात. दररोज सकाळी १२० ते १३० नागरिक जेवतात रात्रीच्या वेळी देखील एवढेच नागरिक जेवण करतात या खानावळ धारकांना सुमारे ३ ते ४ दिवस व्यावसायिक गॅस सिलेंडर लागते मात्र गॅस सिलेंडर मिळत नसल्याने खानावळी समोर इंधन मिळत नसल्याने खानावळ बंद असल्याचे सूचनाफलक लावले आहे.
इंधनाचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर खानावळ सुरू होईल असे या सूचना फलकावर लिहिले आहे.यामुळे कमी खर्चात घरगुती जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांची परवड होत आहे.