चाळीसगाव ; शहरातील शिवजी तेजपाल शहा कंपाउंड परिसरातील सुरज मार्टच्या बाजूला असलेल्या मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले मंडप डेकोरेशनचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोडाऊनमध्ये कापडी मंडप, सजावटीचे साहित्य, प्लास्टिक व लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. त्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे काम केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, गेल्या महिनाभरात याच परिसरात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली होती. त्यामुळे या भागात वारंवार आग लागण्याच्या घटनांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
चाळीसगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेत पालिका प्रशासनाने अग्निशामन दलाच्या बंबांमध्ये वाढ करण्याची गरज आहे
उन्हाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी आग लागल्याचे प्रकार घडून येतात तर आपल्याकडे असलेल्या बंबांमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक वेळेस बाहेरील पालिकेचे बंब मागवावे लागले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत पालिका प्रशासन आणि त्वरित अग्निशमन बंबांमध्ये वाढ करण्याची गरज आहे